मुले हि राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे- पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे

"भावपूर्ण श्रद्धांजली"

"माझ्या अतिप्रिय बाळ गोपाळांनो".... ते "आता उरलो आशीर्वादापुरता...." 10 जून शाळेचा पहिला दिवस... त्यामुळे सकाळी लवकर उठलो ,नेहमीच्या सवयीप्रमाणे सोशल मीडिया ओपन करून व्हाट्सअप पाहत असताना "भावपूर्ण श्रद्धांजली" असं दिसलं बघतो तर आदरणीय राऊत सर रात्रीच इहलोकीची यात्रा संपून परलोकी गेले होते. थोडा वेळ मन सुन्न झालं.पहिला विचार मनात आला तो म्हणजे "द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला कडू काहो झाला संगती गुण."कधीतरी सातवी आठवीत असताना शनिवार सकाळच्या चिंतनामध्ये श्री संत निळोबाराय विद्यालयामध्ये आदरणीय गुरुवर्य कैलासवासी राऊत सर यांच्या तोंडून ऐकलेला तुकोबारायांचा अभंग मनात तरुण गेला, असे अनेक अभंग शनिवारच्या चिंतनामध्ये राऊत सर घेऊन उदाहरणासह गोष्टी रूपाने विद्यार्थी मनाला भावेल असे त्याचे निरूपण करायचे. आणि या अभंगांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले, वाईट संगत, वाईट व्यसनांपासून दूर ठेवले त्यापैकी मी (जे.डी.मापारी)एक सरांचा SSC 1997 व HSC 1999 बॅचचा शिष्य... आज 10 जून शाळेचा पहिलाच दिवस होता. मनात आले आज श्रद्धांजली स्वरूप शाळेला सुट्टी द्यावी का? पण नंतर मनात विचार आला की ज्या सरांनी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आयुष्य कामी पाडले , त्या गुरुवर्यांसाठी शाळा सुरू ठेवून श्रद्धांजली देणे हे संयुक्तिक ठरेल म्हणून सरांच्या निधनाची बातमी समजूनही डीबीएम स्कूल सुरू ठेवले. "Show must go on" हा ही सरांच्या संस्काराचा एक भाग आहे. कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांना सामोरे जाण्याचे बळ सरांच्या शिकवणीतून मिळाले. आदरणीय अण्णांच्या संकल्पनेतील नापासांची शाळा प्रत्यक्षात साकार करून संपूर्ण देशाभरात नावारूपाला आणण्यात सरांचा सिंहाचा वाटा.... आपल्या सर्व सहकार्यांवर बंधुतुल्य प्रेम करून, प्रशासनावर मजबूत पकड स्थापित करून, सर्वांना विश्वासात घेत सरांनी आपल्या कार्य-कालात हजारो उनाड, नापास, व्यसनी विद्यार्थ्यांना जगण्याची नवी उमेद ,प्रेरणा देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्याचीच परिनिती म्हणून शेकडो विद्यार्थी शिक्षक,झाले शेकडो विद्यार्थी आर्मीमध्ये भरती झाले, कित्येक डॉक्टर ,इंजिनियर , व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी झाले आणि आपापल्या आयुष्यात संस्काराची शिदोरी घेऊन जाऊन ती आयुष्यभरासाठी वापरत आहेत हे राऊत सरांच्या दूरदृष्टीचे फलीत आहे. सरांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार रुजावेत यासाठी अनेक उपक्रमांचे अगदी पद्धतशीरपणे आयोजन केलेले होते. राळेगण सिद्धी मध्ये श्रमदानातून अनेक कामे उभी राहिली त्यामध्ये श्री संत निळोबाराय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचा देखील मोठा वाटा आहे. राळेगणसिद्धी परिसरातील वेगवेगळ्या डोंगरांवर वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन करणे,गावची व शाळेची सफाई करणे इतकेच नव्हे तर शाळेच्या इमारतीच्या पायाभरणीपासून तर पूर्णत्वाला जाईपर्यंत विद्यार्थ्यांनी श्रमदानातून आपले योगदान दिले. विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार रुजवण्याचे काम राऊत सरांच्या कार्यकाळात त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने झाले. हेच श्रमसंस्कार पुढे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात कामी आले स्वावलंबी शिक्षण हे प्रत्येकाला कळत गेले. पुढे आयुष्यात जे- जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात गेले तेथे कुणालाही श्रम, कष्ट करण्याची कधीच लाज वाटली नाही. श्रमसंस्कारांची ही शिदोरी आजही विद्यार्थी चाखत आहेत. "शरीर माध्यम खलु धर्म साधनम l" याप्रमाणे विद्यार्थी हा आरोग्य संपन्न असावा यासाठी सरांनी बलसंवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. सकाळी साडेपाच वाजता हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसोबत गावातीलही विद्यार्थी मैदानावर हजर असावेत असा सरांचा दंडक असे व या विद्यार्थ्यांची पहाटे हजेरी घेऊन सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्यांचा मागोवा घेतला जाई, पुन्हा संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत वेगवेगळ्या खेळांच्या प्रॅक्टिस चालत यामध्ये स्वतः सर ग्राउंड वर उभे राहून पाहत असत. त्यावेळी मैदान हे सकाळी व संध्याकाळी पूर्ण गजबजलेले असायचे. तालमीमध्ये विद्यार्थी असायचे. याचा परिणाम म्हणून अनेक आरोग्य संपन्न पिढ्या तयार तर झाल्याच परंतु त्यातील अनेक विद्यार्थी हे क्रीडा क्षेत्रात नावाजले, पोलीस ,आर्मी ,सशस्त्र बल अशा ठिकाणी सहज भरती झाले. खऱ्या अर्थाने सर विद्यार्थ्यांमध्ये बलसंस्कार रुजवण्यात यशस्वी झाले ही उर्मी आज तागायत टिकून होती. (आत्ताच काही दिवसांपूर्वी राऊत सर (माऊली मापारी मेजर निवृत्त सैनिक) यांस म्हणाले होते की आपण तालमीमध्ये तूप ,हळद ,माती यासाठी अण्णांना भेटूया.... पण ही भेट आधुरीच राहिली.... प्रज्ञा विकास काय असतो हे राऊत सरांकडून शिकलो. सरांचा तसा मूळ विषय विज्ञान परंतु सरांनी अध्यात्म व विज्ञान यांची अतिशय उत्कृष्ट अशी सांगड घातली होती कोणत्याही वर्गात गेल्यानंतर राऊत सर विद्यार्थ्यांना विचारायचे की तुम्हाला कोणता विषय अवघड जातो? आणि विद्यार्थी जो विषय सांगतील तो विषय शिकवायला सुरुवात करायचे अशा प्रत्येक विषयावर सरांची मजबूत पकड होती .1998 - 99 साली बारावीला असताना नवीनच वर्ग सुरू झाल्याने इंग्रजीचे शिक्षक नव्हते .त्यावेळी सरांनी आम्हाला इंग्रजी विषय अतिशय सोपा करून शिकवल्याचे आजही आठवणीत आहे. जसे बलसंवर्धन तशाच प्रकारे शील संवर्धन... सरांच्या मूर्तीवंत प्रेरणेने श्री संत निळोबाराय विद्यालयातून अनेक शिक्षकही घडले, जे राऊत सरांचे वेगवेगळे संस्कार आपल्या स्वतःत रुजवून आजही आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये ,समाजात खऱ्या अर्थाने संस्कार पेरत आहेत असे अनेक शिक्षक घडले... त्यातील मीही एक सरांचा आजन्म विद्यार्थी.... डीबीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार देण्याचे काम करत आहे. याचे सर्व श्रेय पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे व गुरुवर्य आदरणीय कै.राऊत सर यांचेच आहे. 2008 मध्ये शैक्षणिक कार्य करणारी संस्था म्हणून जेव्हा संस्थेला नाव द्यायचे ठरले त्यावर खूप विचार करून 'संस्कार प्रतिष्ठान'असे नाव दिले त्यावेळी देखील सरांनी सांगितले होते की शाळा कोणत्याही माध्यमाची असो परंतु विद्यार्थ्यांना संस्कार हे मिळालेच पाहिजे संस्कारक्षम शिक्षण हेच खरे शिक्षण आणि सरांच्या या वाक्यातील प्रेरणेने आजही आम्ही मार्गक्रमण करत आहोत सरांनी दाखवलेल्या या पायवाटेवरून चालत आहोत. श्री संत निळोबाराय विद्यालयात नापास विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याने त्यांची अगदी मुळापासून तयारी करून घेण्यासाठी सरांनी Remedial Teaching म्हणजेच आमच्या त्या वेळेच्या विद्यार्थी भाषेत "दारिद्र्यरेषेखालील तास" सकाळी 8.00 ते 9.30 असे विशेष वर्ग सरांच्या संकल्पनेतून भरवले गेले की ,ज्या वर्गामधून विद्यार्थ्यांना पूर्णतः पायाभूत शिक्षण दिले गेले. व त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात सामावण्याचे काम घडले. आजही असे शेकडो विद्यार्थी आहेत की जे स्वतः सांगतात, "आम्ही जर राळेगणच्या शाळेमध्ये शिकलो नसतो तर आयुष्यामध्ये पूर्ण वाया गेलो असतो." हा एवढा मोठा समाज घडवण्याचं काम आदरणीय राऊत सरांच्या मार्गदर्शनातून होत गेले. पुढे शिक्षक झाल्यानंतर काही वर्ष असे तास घेण्याचे योग माझ्याही वाट्याला आले हे माझे परम भाग्यच.. तसेच रात्रीच्या अभ्यासिकेबद्दल ...पूर्वी गावामध्ये सर्वांच्या घरी लाईट नसल्यामुळे रात्री 8.00 ते रात्री 9.30 पर्यंत रात्र अभ्यासिका चाले .'नाईट स्टडी' हा देखील सरांनी राबवलेला एक अनोखा उपक्रम यामध्ये विद्यार्थी शाळेत येऊन वर्गामध्ये बसून अभ्यास करायचे,काही शंका असतील तर शिक्षकांना विचारायचे यामधून स्वयं- अध्ययनाची सवय मुलांना लागली. पहाटे 5.30 वाजता सुरू झालेला दिवस रात्री 9.30 वाजता या अभ्यासिकेने संपायचा. राळेगण सिद्धी कर्मभूमी मानून राऊत सर आपल्या कुटुंबाचा, घरादाराचा, गावाचा त्याग करून राळेगणसिद्धी येथेच स्थायिक झाले. व राळेगणसिद्धी परिवाराचे एक कुटुंबप्रमुख झाले. निवृत्तीनंतरही राळेगण सिद्धी मध्येच सरांनी वास्तव्य चालू ठेवले. आदरणीय अण्णांसोबत तन ,मन,धनाने आपली सेवा सुरूच ठेवली. हिंद स्वराज्य ट्रस्टच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या लोकांना राऊत सरांनी वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आदरणीय अण्णांबद्दल, गावातील विविध उपक्रमाबद्दल, नापासांच्या शाळेबद्दल, होस्टेल बद्दल व्याख्यान देतच राहिले. आजन्म ते शिक्षकच राहिले... निवृत्तीनंतर माजी विद्यार्थी त्यांना आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात निमंत्रित करत असत. त्यावेळी सरांना भाषण करायला आवर्जून सांगितले जाई. पण राऊत सर परिस्थितीचे व समोरील श्रोता वर्गाचे भान ठेवून नेहमीच मोजक्या शब्दात भाषण करत व भरभरून आशीर्वाद देत. माजी विद्यार्थ्यांच्या लग्नात व पुढे त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात शुभाशीर्वाद देताना राऊत सर अगदी मोजक्या शब्दात शुभाशीर्वाद देत व आवर्जून कन्यादान करणाऱ्या मातेला वंदन करत.हेच सरांचं वेगळेपण होतं. संपूर्ण शुभकार्यात कन्यादान करणारी माता ही श्रेष्ठ आहे पण कदाचित तेवढीच दुर्लक्षित आणि ह्याच भान ठेवून राऊत सर त्या मातेचाही उल्लेख करून वंदन करत असत, की जे इतर कोणी आजही करत नाहीत. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2023 रोजी श्री संत निळोबाराय विद्यालय मध्ये विद्यालयाच्या स्थापनेपासून तर 2023 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. या कार्यक्रमात प्रत्येक बॅचचे विद्यार्थी पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस ,तीस, चाळीस वर्षानंतर भेटणारे होते. हजारो विद्यार्थी एवढ्या वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे आपापसात कुजबुजत होते, पुढे कार्यक्रम लांबत होता आणि सर्वांना शांत करणे कठीण होऊन गेले अशा वेळी राऊत सर भाषणाला उभे राहिले व फक्त "माझ्या अतिप्रिय बाळगोपाळांनो".... या वाक्याने पूर्ण मैदान अगदी शांत झाले. हे मायेचे शब्द सर्वांनी अनेक वर्षांतून ऐकले होते सगळे विद्यार्थी भावुक झाले होते. आता पुन्हा ते शब्द आम्हाला मायेची साद घालणार नाहीत..... याच कार्यक्रमात सरांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा संत तुकारामांच्या अभंगातच 'आता उरलो उपकारापुरता' असे सांगताना "आता उरलो आशीर्वादापुरता" असा उल्लेख सरांनी केला होता. सर तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे, कदाचित देवांनाही या आशीर्वादाची गरज पडली असावी म्हणूनच आपणाला बोलावले असेल. जेव्हा जेव्हा सरांना भेटायचो तेव्हा सर अगदी मायेने जवळ घ्यायचे,डोक्यावरून,तोंडावरून,पाठीवरून हात फिरवायचे अगदी प्रेमाने चौकशी करायचे. अगदी भरभरून आशीर्वाद द्यायचे या सर्व गोष्टींना आम्ही सर्व बाळ-गोपाळ आता मुकणार..... गेल्या 17 वर्षांपासून डी बी एम स्कूलच्या माध्यमातून मी व माझी पत्नी सौ शीतल पूर्ण वेळ शिक्षण कार्यात व्यस्त असल्याने व राऊत सरांनी आमचा हा शिक्षण प्रवास जवळून पाहिला असल्याने सरांनी एक दोन वेळा आमचा उल्लेख 'ज्योती - सावित्री ' असा केला. (अर्थात आम्ही एवढ्या महान पात्रतेचे नक्कीच नाहीत.) परंतु हा एक सरांचा आमच्यासाठी शब्द गौरव/ आशीर्वाद म्हणावा लागेल. सर आम्ही तुमचे सर्व शिष्य वचन देतो की "उतणार नाही,मातणार नाही ,घेतला वसा टाकणार नाही." तुम्ही दिलेल्या संस्काराच्या शिदोरीचा नेहमी चांगल्या कार्यासाठीच उपयोग करू. सरांच्या हजारो अतिप्रिय बालगोपाळांपैकी एक गोपाळ होण्याचा योग आयुष्यात आला आणि सरांचे भरभरून आशीर्वाद मिळाले यातच भरून पावलो. सर आपणच म्हटल्याप्रमाणे "आता उरलो आशीर्वादापुरता..." आपले आशीर्वाद आम्हा बाळगोपाळांसोबत नेहमी आहेतच..... सर तुम्ही आमच्यातच आहात...कारण एका शिक्षकाचे आयुष्य किती असं म्हटल्यावर उत्तर येतं =(तुमचे हजारो विद्यार्थी X ते विद्यार्थी जेवढे वर्ष जगतील तेवढी वर्षे.) आपलाच एक प्रिय बाळगोपाळ जे. डी.मापारी, संस्थापक अध्यक्ष,(संस्कार प्रतिष्ठान) डी.बी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, राळेगणसिद्धी

JD Mapari

6/17/20241 min read

Holistic Learning Environment